कोरची ( चेतन कराडे - तालुका प्रतिनिधि ) : नेहमी भोंगळ कारभारासाठी चर्चेत राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालय कोरची येथे ५ ऑगस्टला मुख्यालयापासून अंदाजे १३ ते १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या खिरूटोला येथील अस्मिता प्रेमदास सहारे (वय २०) व विवान विलास राऊत (वय ३) यांचे निधन झाल्यामुळे खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ५ तारखेला रात्री सुमारे साडेबारा ते १ च्या दरम्यान अस्मिता सहारे यांना पोटात दुखणे व अस्वस्थ वाटू लागले. म्हणून लगेच 108 या रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला परंतु रुग्णवाहिका प्राप्त न झाल्यामुळे रात्री दिडच्या दरम्यान अस्मिता सहारे यांना घेऊन तिच्या आई-वडिलांनी दुचाकीने ग्रामीण रुग्णालय गाठले. खूप वेळ आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयाचे दार उघडण्यात आले व वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत हे उपस्थित असून सुद्धा परिचारिकेने औषधोपचार केला. मध्यरात्रीला प्रकृती खालावत असताना कुठलेही आरोग्य कर्मचारी त्या रुग्णाच्या जवळ उपस्थित नव्हते व तिचा उपचार सुद्धा वेळेवर करण्यात आला नाही अशी खंत रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबतची विचारणा रुग्णांचे नातेवाईक करीत असताना त्यांना सुद्धा उद्धटपणे वागणूक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वेळेवर पाहिजे असे औषध उपचार मिळत नसल्या कारणाने नातेवाईकांनी अस्मिताला एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले परंतु तेथे तिचा मृत्यू नंतर. नंतर सकाळी ५ च्या दरम्यान पुतण्या विवान याच्या पोटात सुद्धा दुखू लागल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दुचाकी च्या साह्याने आणण्यात आले. दोघेही रुग्णांची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांचे तातडीने उपचार होणे अपेक्षित होते परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळेे विवान याला स्वखर्चाने 102 च्या साह्याने गडचिरोली येथे रेफर घेऊन जाण्यात येत असताना कुरखेडा नजिक त्याचा सुद्धा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबतची माहिती घेण्याकरिता डॉ. राऊत यांच्याशी रुग्णालयात भेट घेण्यास गेले असता ते स्व गावी गेले असल्याची माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीनुसार रुग्णांच्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली होती की मावशी व पुतण्या यांनी संध्याकाळी चिप्स, कुरकुरे व रात्री कारल्याची भाजी खाल्ली होती व शरीराच्या हालचाली वरून कुठलीतरी विषबाधा (कदाचित सर्पदंश) झाले असल्याचे दिसून येत होते. परंतु याबाबतची माहिती पोलिस विभागाला सुद्धा देण्यात आली नाही.
वैद्यकीय अधिकारी यांनी सहकार्य केले नाही:
माझ्या बहिणीचा त्रास वाढत होता व तिची बोलण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती अशा वेळेस मी वैद्यकीय अधिकारी यांना विनंती करत असताना त्या रुग्णांपेक्षा तुझी प्रकृती जास्त खालावत असल्याचे उत्तर डॉ राऊत यांनी दिले. याबाबतची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अशी पत्रकार समक्ष प्रतिक्रिया दिली.
- संगीता यांना
- मृतक अस्मिता सहारे यांची बहीण