कोरची - कोरची मुख्यालयापासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगाटोला येथील नागरिक मागील 20 दिवसापासून अंधारात राहत असल्याचे दिसून येत आहे. कारण 20 दिवसापूर्वी बोगाटोला येथील ट्रांसफार्मर उडाले असल्याची माहिती प्राप्त झाली असून 8 दिवसापूर्वी याकरिता बोगाटोला येथील गावकरी हे निवेदन देण्यात करिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालय कोरची येथे आले असता त्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले नाही. याबाबतची माहिती बोगाटोला येथील लाईनमॅन यांना देण्यात आली व विद्युत पुरवठा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. परंतु परिस्थिती अजूनही जैसे थे असून याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसांमध्ये परिसरात विषारी जीवजंतूचा संचार बघितला जातो. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बोगाटोला येथील काही पशुपक्षी हे सर्पदंशाने दगावले आहेत. म्हणून लवकरात लवकर नवीन ट्रांसफार्मर लावून विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी बोगाटोला येथील गावकऱ्यांनी केली आहे. गावात लहान लहान मुले ही बाहेर खेळत असतात त्यामुळे कधी पण धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी बोगाटोला येथील नागरिकांनी केली आहे.