गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील वैनगंगा, प्राणहिता नद्यांमधील पाण्याचा विसर्ग गोसीखुर्द व वर्धा नदीच्या पाण्यामुळे काही प्रमाणात वाढत असून नदीकाठच्या गावांमधे सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनी, वडसा व वाघोली या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी व विसर्ग वाढलेला आहे. नदीची पाणी पातळी आष्टी केंद्रावरील नोंदीनुसार धोका पातळीच्या वर आहे. जिल्हयात सुरू असलेली संततधार व नदीमधील विसर्ग यामुळे नदीकाठच्या गावांमधे नाले भरून वाहत आहेत. अजूनही जिल्हयात 18 लहान मोठे रस्ते पाण्याखाली आहेत. नागरिकांनी अशा स्थितील रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. आपतकालीन स्थितीत काही आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाद्वारे मदत घ्यावी. दुसरीकडे गोदावरी नदीकाठी असलेल्या गावांमधील स्थलांतरीत नागरिक आपापल्या घरी परतत आहेत. आता सिरोंचा तालुक्यात अजूनही दोन गावातील 192 नागरिक निवारागृहात आहेत. तर जवळपास 10150 नागरिक पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. जिल्हयातील वेगवेगळया तालुक्यात अजून 85 कुटुंबातील 287 जण निवारागृहात आहेत.
सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस, सिरोंचात तीनशे टक्के पावासाची नोंद
1 जून पासून जिल्हयात सरासरीच्या तुलनेत दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. 19 जुलै पर्यंत 473.2 मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. परंतू यावर्षी दुप्पट म्हणजेच एकुण 855 मिमी पाऊस झाला. मागील वर्षी मात्र आज रोजी पर्यंत फक्त 407.9 मिलिमीटर म्हणजेच 86.2 टक्के पाऊस झाला होता. यावर्षी सर्वात जास्त पाऊस 1280 मिमी सिरोंचा, 1134 मिमी अहेरी तर भामरागड 1055 मिमी नोंद झाली. गडचिरोली जिल्हयातील सरासरी पावसाची आकडेवारी पाहिल्यास जुलैच्या शेवटी व ऑगस्टमधे पावसाचे प्रमाण जास्त असते. मात्र यावळी आताच वार्षिक सरासरी 1254.1 मिमी च्या 68 टक्के पाऊस जिल्हयात पडला आहे. सिरोंचामधे वार्षिक सरासरी पुर्ण करून 116 टक्के पाऊस आताच झाला. त्या पाठोपाठ अहेरी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडला आहे.
1 जुन पासून सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या पावसाची आकडेवारी
(तालुका नाव - 1 जून ते 19 जुलै पर्यंत पडणारा सरासरी पाऊस - या वर्षी 19 जुलै पर्यंत पडलेला पाऊस व टक्केवारी या क्रमाने –मिमी मधे)
- गडचिरोली – 547.4 - 832.6 - 152.1 टक्के
- कुरखेडा – 563.0 – 710.9 – 126.3 टक्के
- आरमोरी – 456.7 – 745.1 – 163.1 टक्के
- चामोर्शी – 364.3 – 727.5 – 199.7 टक्के
- सिरोंचा – 402.0 – 1280.0 – 318.4 टक्के
- अहेरी – 474.2 – 1134.9 – 239.3 टक्के
- एटापल्ली – 520.3 – 799.9 – 153.7 टक्के
- धानोरा – 591.7 – 631.8 – 106.8 टक्के
- कोरची – 552.4 – 747.3 – 135.3 टक्के
- देसाईगंज – 502.0 – 737.9 – 147.0 टक्के
- मुलचेरा – 470.8 – 861.6 – 183.0 टक्के
- भामरागड – 491.8 – 1057.5 – 215.0 टक्के
- जिल्हा एकुण – 473.2 – 855.6 – 180.8 टक्के