गडचिरोली: सद्यास्थितीत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या उर्वरीत भागातही पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.
दिनांक 8 जुलै पासून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संलग्न जिल्ह्यात तसेच गडचिरोली जिल्ह्यात दोन-तीन दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज यांमधून विसर्ग प्रवाहीत करण्यात आल्याने मेडीगड्डा बॅरेज स्थळी गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असल्याने बॅरेजचे 75 गेट उघडण्यात आलेले असून टप्प्या टप्प्याने विसर्गामध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत आज सायंकाळी 6 वाजताच्या नोंदीनुसार मेडीगड्डा बॅरेजमधून 8.83 लक्ष क्युसेक्स विसर्ग प्रवाहीत होत असुन इंद्रावती नदीवरील पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार 2.56 लक्ष क्युसेक्स विसर्ग आहे.
गोदावरी व इंद्रावती नदीच्या संगमाचे ठिकाणी 11.39 लक्ष क्युसेक्स विसर्ग प्रवाहीत होत असून नदीच्या बॅक वॉटर मुळे सिरोंचा, अहेरी व भामरागड या तालुक्यातील नदी, नाल्याच्या काठी असलेल्या गावांमध्ये पूर स्थिती उद्भवलेली असुन बहुतांश गावांचा संपर्क तुटलेला आहे. पाणलोट क्षेत्रात पाण्याचा सतत येवा वाढत असल्याने विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असल्याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून सूचना प्राप्त झालेली असून नदीकाठावरील गावात भरपूर प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत गोदावरी नदी ही कालेश्वरम स्टेशन (सिरोंचा) येथे इशारा पातळीच्या वर वाहत असून धोका पातळीच्या 0.50 मीटर ने खाली वाहत आहे. नागरीकांनी सावध रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.