सांगली : सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून हत्याकांड झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आले आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ही माहिती दिली.
दोन आरोपींनी या नऊ जणांना जेवणात विष घालून त्यांना ठार मारल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मृत डॉ. माणिक बल्लापा व्हनमोरे आणि पोपट यलाप्पा व्हनमोरे यांची गुप्त धनाबाबत एका अनोळखी व्यक्तीसोबत भेटीगाठी होत होत्या. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी समोरच्या व्यक्तीला पैसे देखील दिले होते. ज्या व्यक्तीला पैसे दिले होते त्या व्यक्तीचे वनमोरे यांच्या घरी येणं जाणं होतं.
पोलिसांच्या सखोल तपासानंतर ती व्यक्ती सोलापूरमधील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी सोलापूरमधील मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे यांना अटक केली.
दरम्यान, अटक करण्यात झालेल्या व्यक्ती 19 जून रोजी म्हैसाळमध्ये येऊन गेल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. सदरील घटनेप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.