पिंपरी : राज्यात मागील काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरुच आहे. कालच नाशकातील वणी येथे एका मोठ्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आता मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune highway) अपघात झाला असून, या अपघातात (Accident) कंटेनरने दुचाकीवरील चौघांना चिरडलं आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai Pune highway) किवळे- देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर दोघे गंभीररित्या जखमी झाले असल्यानं त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कालच नाशिकमधील वणी येथे अपघातात ८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर आज मुंबई पुणे हायवेवर अपघातात मायलेकीला आपला जीव गमवावा लागला आहे.