गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोर्ला येथे वाघाच्या हल्ल्यात 30 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 26 जून रविवार सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. किशोर तुळशीदास मामीडवार ( वय 30 वर्ष ) रा.पोर्ला ता जि गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
किशोर हा सकाळी पोरला येथून 6 किलोमीटर अंतरावर वनविभागाच्या राखीव जंगल परिसरात जळाऊ लाकडे आणण्यासाठी गेला असता दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व जागीच ठार केले.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
आरमोरी तालुक्यातील इंजेवारी परिसरात दहशत निर्माण करणारा नरभक्षी वाघ या युवकाचा बळी घेतला असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी या परिसरातील जंगल परिसरात जाऊ नये असे आवाहन वनविभागाद्वारे करण्यात आले आहे.