पुणे : शिकवणीसाठी घरी येणाऱ्या शिक्षिकेचे बाथरुममधे मोबाईल लपवून 16 वर्षाच्या मुलाने चित्रिकरण करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. हा मुलगा सध्या दहावीत शिकत असून त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मागील पाच वर्षांपासून इंग्रजी विषयाची खाजगी शिकवणी लावली होती. मुलगा 10-11 वर्षाचा असल्यापासून सदर शिक्षिका या मुलाला इंग्रजी शिकवते. त्यासाठी ही शिक्षिका कोथरुडमधील त्याच्या घरी त्याला शिकवायला जात होती.
काल ही शिक्षिका त्याच्या घरातील बाथरुमचा वापर करण्यासाठी गेली असता आतमधील साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना या शिक्षिकेला दिसले. साबणाचे खोके बाजूला केले असता त्या पाठीमागे मोबाईल लपवला असल्याचे आणि त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याचे या शिक्षिकेला आढळून आले. त्यानंतर ही शिक्षिका मोबाईल घरी घेऊन गेली आणि तिने मोबाईल तपासला असता. त्यात जे काही दिसलं त्यानंतर या शिक्षिकेला हादराच बसला. त्यामध्ये तिचे याआधी बाथरुममध्ये केले गेलेले चित्रीकरण आढळून आले. त्याचबरोबर इतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ देखील त्या मोबाईलमध्ये आढळून आले.