नागपुर: हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साडरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. घरोघरी गुढी उभारुन नववर्षाची सुरुवात केली जाते. खरेदी करता बाजारातही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मुंबई आणि पुण्यातील शोभायात्रांची शान काही वेगळीच असते.
पाडव्याच्या मुहूर्तावर साई पालख्यांचे प्रस्थान:
गेले दोन वर्ष कोरोनामुळे साई भक्तांना साई पालखी काढता आल्या नाहीत. मात्र यंदा महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कमी झाल्याने सरकारने निर्बंध उठवले आहेत. यामुळे शेकडोच्या संख्येने राज्यभरातील साईभक्त साई पालखीत पुन्हा शामिल झाले आहेत. पुढील दहा दिवस हे साई भक्त पायी शिर्डीला पोहचणार आहेत. साईभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. विविध देखावे, साई पालखीसह साई नामाचा जयघोष करीत हे साईभक्त शिर्डीला रवाना झाले आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.