समुद्रपूर : तालुक्यातील शेडगाव जुनापाणी शिवारात दोन मुले खेळता खेळता शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राम खोत यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शेडगाव जुनापाणी शिवारात नागपूर येथील पंचभाई यांचे शेत असून त्यांच्या शेतात शेतीकामासाठी एक कुटुंब राहत होते. त्यांना ६ वर्षीय मुलगी व ४ वर्षीय मुलगा होता.
आज दुपारच्या सुमारास आई – वडील शेतात काम करीत होते. दोन्ही बालक हे खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले. आणि ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई – वडीलाने त्यांचा शोध घेतला असतांना मुलाचे प्रेत शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. यावेळी तळ्यात बघितले असता मुलीचे प्रेत सुध्दा दिसून आले. या संबंधी समुद्रपुर पोलिसांना माहिती देताच समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम खोत व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास समुद्रपुर पोलिस करीत आहेत.