चंद्रपूर:- भद्रावती येथील बहुचर्चित युवती हत्याकांडातील फरार आरोपी शंकर शेखर कोरवन (२६) रा.भद्रावती याला येथील न्यायालयाने दि.१९ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शंकर कोरवन हा आरोपी काजल तिवारी या युवतीच्या हत्याकांडानंतर फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दि.११ एप्रिल रोजी रात्री तो बल्लारपूर रेल्वे स्थानकावर असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळताच सापळा रचून पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाने शंकर कोरवनला मोठ्या शिताफीने अटक केली. त्यानंतर त्याला भद्रावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दि.१३ एप्रिल रोजी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या हत्याकांडात आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध पोलिस घेत आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी अल्पवयीन युवती आणि शंकर कोरवन असून त्यांच्या विरुद्ध भद्रावती पोलिस ठाण्यात भा.दं.वि.३०२, २०१ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.