हातात हात घालून अल्पवयीन प्रेमींची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या
नागपूर : नागपुरात ( Nagpur) अल्पवयीन प्रेमीयुगुलाने हातात हात घालून हावडा अहमदाबाद एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या ( Suicide ) केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास उघडकीस आली. नवीन कामठी पोलिसांनी (Kamathi Police Station Nagpur ) दिलेल्या माहितीनुसार कामठी कळमना मार्गावरील जयभीम चौक परिसरातील आदित्य लक्ष्मीनारायण कुरील (वय १८) व त्याच परिसरातील सायली गौतम नगराळे (वय १६) यांची गेल्या ३ वर्षापासून मैत्री होती. हळूहळू भेटीगाठी वाढल्या व मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
घरच्यांनी व पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु कुठेही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. एकमेकांवरील प्रेम व घरच्यांचा विरोध यातून कसा मार्ग काढायचा या विवंचनेत दोघे असावेत. यातूनच त्यांनी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कामठी कन्हान रेल्वेमार्गावरील कन्हान नदी पुलाजवळील आडा पुलाजवळ हावडावरून अहमदाबादला जाणाऱ्या एक्सप्रेससमोर हातात हात घालून उडी घेऊन आत्महत्या केली.
शनिवारी सकाळी दोघांचेही मृतदेह सापडले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे सहकार्यांसोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. घटनास्थळावरून पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. तर, या घटनेने जयभीम चौक परिसरात शोककळा पसरली आहे.