गोंदिया : इंधन दरवाढीने आता सामान्यांचे जगणे मुश्कील झाले असून आता गॅसच्या किमती भडकल्याने त्यात भर पडली आहे. मागील तीन वर्षांत पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच आता खाद्यतेलाचेही दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तर, पुन्हा चुली पेटल्या असतानाच आता शहरी भागातही तीच परिस्थिती निर्माण होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या काळात आधीच रोजगार हिरावला आहे. त्यात व्यवसाय सुद्धा ठप्प पडत आहेत. नेहमीपेक्षा मिळकत कमी झाल्याने घरखर्चात बचत करून जगणे सुकर करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, वाढती महागाई त्यात मिठाचा खडा टाकत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आगामी काळात कसे जगायचे, याची चिंता लागली आहे. याबाबत वारंवार ओरड होत असली तरीही यावर उपाय काही सापडत नसून केंद्र शासन दरही कमी करायला तयार नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने गॅससोबतच इतर इंधनाच्या दरातदेखील सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा ताण पडत आहे.
गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढतच आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गॅस जोडण्या दिल्या आहेत. आता गॅसचे दर भडकल्याने हे सिलिंडर घरात एका कोपऱ्यात पडले आहेत. केवळ काही घरांमध्येच त्यांचा वापर होत आहे. ग्रामीण भागात पुन्हा इंधनासाठी सरपणच आणले जात आहे. वाढत्या दराचे सिलिडर परवडत नसल्याने महिलांच्या डोक्यावर मोळी व डोळ्यांना धुराचा वास सुरू झाला आहे. त्यात आता शहरी भागाला लागून असलेल्या वस्त्यांमध्ये चुली पेटत असल्याचे चित्र असून शहरातील नागरिकांवरही हीच वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.