गोंदिया : शहरातील गणेशनगर परिसरात असलेल्या सोनल अशिष शर्मा यांच्या घरी ९ मार्च रोजी कुरिअर बॉय असल्याचे सांगून एक महिला आणि पुरुषाने घरात प्रवेश केले. दरम्यान, सोनल शर्मा यांच्यावर चाकूने हल्ला करून पसार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या वकील महिलेसह सुरज केशव रावते याला अटक केली. शहरातील गणेश नगर येथील दादा चौकात राहणाऱ्या सोनल आशिष शर्मा यांच्या घरी ९ मार्च रोजी दुपारी १ वाजता अनोळखी एक महिला आणि पुरुष आले. त्यांनी आपण कुरिअर कंपनीतून असून आपले पार्सल आले आहेत.
हे सुद्धा वाचा
कागदावर स्वाक्षरी करा, असे म्हटले. सोनल शर्मा बाहेर आल्या असता त्यांचा उजव्या हाताचे मनघट, डावे गाल, उजव्या हाताचा अंगठा आणि डाव्या हाताच्या अंगठीवर चाकूने मारून जखमी केले. सोनल शर्मा यांच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या माध्यमातून तांत्रिक पद्धतीने तपास केला. या प्रकरणी पोलिसांनी सुरज केशव रावते (वय ५०, रा. टीबीटोली ) आणि चाळीस वर्षीय महिलेला अटक केली. महिला आरोपी पेशाने वकील आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महिला आरोपीची सोनल शर्मा यांचे पती आशिष शर्मा यांच्यासोबत ओळख होती. महिला आरोपी वकीलाने दुसरा आरोपी सुरज रावते याला सोनल शर्मा यांच्या हत्येची ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.