डॉक्टर नेहा आत्महत्या प्रकरण |
चिखली : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील रहिवासी दंत चिकित्सक डॉ. नेहा पारधी हिने दोन दिवसांपूर्वी तिरोडा येथे राहत असलेल्या भाड्याच्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. त्यातच नेहाच्या बहिणीने नेहाचा भावी पती, दीर व नणंदकडून नेहाला मानसिक त्रास दिला जात असल्याने तिने आत्महत्या केली, असा आरोप करत तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी डॉ. नेहाच्या भावी पतीसह चार जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
तालुक्यातील सेजगाव येथील डॉ. नेहा पारधी ही तिरोडा येथे भाड्याच्या घरात राहत होती. तर, काही महिन्यांपूर्वीच तिचे बालाघाट येथील दंत चिकीत्सक डॉ. मनीष याचेशी लग्न जुळले होते. मात्र, ४ मार्च रोजी नेहाने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यामुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, नेहाची मोठी बहिण डॉ. प्रियंका देवीरात बारंगे (रा. बालाघाट) यांनी तिरोडा पोलिस ठाण्यात नेहाचा भावी पती व त्याचे कुटुंबीय नेहाला मानसिक व शारिरीक त्रास देत असल्याचे सांगत तक्रार नोंदविली.
यावर तिरोडा पोलिसांनी चौकशी करून नेहाचा भावी पती डॉ. मनीष चुन्नीलाल टेंभरे (वय ३०), दिर मोहित चुन्नीलाल टेंभरे (वय २६), ननद रानी चुन्नीलाल टेंभरे (वय ३६) रितू चुन्नीलाल टेंभरे सर्व राहणार डॉक्टर कॉलोनी, डॉ. धुर्वे हॉस्पीटल समोर, बालाघाट (म.प्र.) या चारही जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भादंवि कलम ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान चार आरोपींचा शोध घेतला असताना सदर आरोपी मिळून आले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर हनवते करीत आहेत.