शास्त्रीनगर येथील दुकानाला मनपाच्या कर वसुली पथकाने ठोकले टाळे
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ( Chandrapur City Corporation ) माध्यमातून कर ( Tax ) वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. दि. १८ फेब्रुवारीला मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाने शास्त्रीनगर ( Shastrinnagar ) भागात मालमत्ता कर व अन्य करांची थकबाकी असलेल्या आणि कर भरण्यास नकार देणाऱ्या मालमत्ता धारकाच्या दुकानास टाळे ठोकले.
शास्त्रीनगर वॉर्ड, झोन क्र. ३ येथील मालमत्ता क्र. ३ A/१२२८/९ च्या मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने दि .१८ फेब्रुवारी २०२२ ला झोन क्र. ३ शास्त्रीनगर वार्ड येथील मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. शास्त्रीनगर वार्ड येथील मा. क्र.३ A/२९०२/२ या मालमत्ता धारकावर सन २०१५ ते २०२२ या वर्षीपासून मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे. परंतु तूर्तास तेथे जप्ती कार्यवाही न करता संबंधित मालमत्ता धारकास वसुली पथकाला सकारात्मक प्रतिसाद देऊन कर भरणा करण्यास कळविण्यात आले.
सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्र. ३ चे सहायक आयुक्त राहुल पंचबुद्धे, सुरज जीवने तसेच शिपाई यांनी केली.