चामोर्शी आणि धानोरा तालुक्यात आढळला ओमायक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण |
गडचिरोली ( Omicron In Gadchiroli ): गडचिरोली नववर्षाच्या जिल्ह्यात पहिल्या आठवड्यापासून कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असतांना आता जिल्ह्यात ओमायक्रॉननेही शिरकाव केला आहे. चामोर्शी व धानोरा तालुक्यात प्रत्येकी एक ओमायक्रॉन बाधीत रूग्ण आढळून आले असल्याने जिल्हयात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून ३० डिसेंबर रोजी पाठवलेल्या ओमायक्रोन तपासणीतील नमुन्यांमध्ये दोन नमुने ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील पहिला नमुना ७ डिसेंबर २०२१ रोजी घेतलेला होता तर दुसरा नमुना २८ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आला होता. दर महिन्याच्या ३० तारखेला पुणे येथून दिल्लीला विविध जिल्ह्यातून निवडक नमुने तपासणीसाठी पाठवले जातात. गडचिरोली जिल्ह्यातील तपासणीचा अहवाल काल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यातील दोन नमुने ओमायक्रोन पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सद्यस्थितीत ७ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण बरा होऊन घरी परतला असून दुसरा रुग्ण धानोरा येथील सीआरपीएफ जवान आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची तब्येत चांगली असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्हयात ३१३ कोरोना तपासण्यांपैकी २२ नवीन कोरोना बाधित:
आज जिल्ह्यात ३१३ कोरोना तपासण्यापैकी २२ नवीन कोरोनाबाधीत आढळून आले. ३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३१०२० पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३०१०७ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या १६६ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७४७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज कोरोनामुळे कुणीही दगावला नाही. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.५४ टक्के तर मृत्यू दर २.४१ टक्के झाला आहे. आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील १८, चामोर्शी तालुक्यातील ०१ आणि देसाईगंज तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३ रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील १ आणि अहेरी तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे.
अद्यापही १५ टक्के नागरीक पहिल्या लसीकरणापासून दुरच:
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्यावतीने वारंवार कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन केले जात असतांना अद्यापही १५ टक्के नागरीक पहिल्या लसीकरणापासून दूरच असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेतलेले ८४. ५० टक्के तर दुसरा डोस घेतलेले ५७ टक्के रुग्ण आहेत. जिल्ह्यात पहिला डोस न घेतलेले १२९७३८ जण बाकी आहेत. तसेच दुसरा डोस कालावधी आलेला असूनही न घेतलेले जवळपास २२९८१५ जण आहेत. जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी ८४.५० इतकी झाली असून दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ५७.०४ एवढी आहे. जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणाबाबत गावोगावी लसीकरणाचे शिविर आयोजित करण्यात येत असून उर्वरित नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.