संसद भवनात कोरोनाचा विषाणूचा शिरकाव
नवी दिल्ली : एकिकडे मुंबईत सीबीआयच्या कार्यालयातील ६८ कर्माचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असताना, आता कोरोनाने संसद भवनात सुद्धा शिरकाव केला आहे. संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. माहितीनुसार, संसद भवनातील ४०० हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ६ आणि ७ जानेवारीला संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली होती, त्यामध्ये ४०० हून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावे असं आवाहन करण्यात आलं आहे. ( Corona virus infiltrates Parliament building )
संसद भवनात कोरोनाने शिरकाव केल्याने भीती व्यक्त केली जात असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सुद्धा चाचणी करावी लागेल, त्यामुळं चिंता वाढली आहे. महाराष्ट्र तसेच मुंबईप्रमाणे राजधानी दिल्लीत देखील आता २० हजारहून कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. शनिवारी दिल्लीत २० हजार १८१ नवे कोरोनाबाधित आढळले, जे गेल्या आठ महिन्यातील सर्वाधिक जास्त रुग्ण आहेत. यापूर्वी ५ मे रोजी २० हजार ९६० कोरोना रुग्णांची नोंद झाली होते. राजधानी दिल्लीतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १६ हजार ९७९वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या २५ हजार १४३ झाली आहे.
यादरम्यान शहरात कोरोना संसर्ग दर १९.६० टक्के झाला आहे, जो गेल्या आठ महिन्यातील सर्वाधिक जास्त आहे. दिल्ली आरोग्य विभागानुसार, गेल्या वर्षी दिल्ली शहरात ९ मे रोजी पॉझिटिव्हीटी दर २१.६६ टक्के नोंद झाला होता. सध्या दिल्लीत ४८ हजार १७८ सक्रीय रुग्ण आहेत. दिल्ली सरकारने कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन १४ रुग्णालयात बेड्सची संख्या ४ हजार ३५० वरून ५ हजार ६५० केली आहे. तसेच रुग्णालयातील आयसीयू बेड्स वाढवून २ हजार ७५ केले आहेत. बेड्सची संख्या वाढवण्यासोबत शनिवारपासून कोविड केअर सेंटर पुन्हा चालू केले आहेत. दिल्लीत ८ कोविड सेंटरमध्ये एकूण २ हजार ८०० बेड्स उपलब्ध केले आहेत. तसेच काही कठोर निर्बंध दिल्लीत लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.