अमरावती (Amaravati) : शहरातील कठोरा मार्गावर पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट अमरावती येथील चार कर्मचाऱ्यांचा विजेच्या धक्क्याने बुधवारी (ता. २९) दुर्दैवी मृत्यू झाला. १२ वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली.इन्स्टिट्यूटच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही दिवसांपासून रंगकाम सुरू होते. रंगकाम करण्यासाठी पंचवीस फुटांच्या एका लोखंडी शिडीचा वापर केला गेला.
(ads1)
रंगकाम पूर्ण झाल्यामुळे शिडी दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या सूचना येथील चार कर्मचाऱ्यांना केली होती. इन्स्टिट्यूटच्या देखभाल व दुरुस्ती विभागातील हे कर्मचारी २५ फूट लांब शिडी बाजूला करण्यासाठी आले. शिडी सरकवित असताना वरून जाणाऱ्या ११ केवीच्या जिवंत विद्युत वाहिनीकडे त्यांचे लक्ष नव्हते. लोखंडी शिडीचा जिवंत विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि त्याच वेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने कर्मचारी अक्षय सावरकर, प्रशांत शेलोरकर, संजय दंडनाईक, गोकुल वाघ या चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर महाविद्यालयीन प्रशासनासह पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. नंतर महावितरणचे कर्मचारी यांनी वीजपुरवठा खंडित केला. लोखंडी शिडी हटवण्यात आली.