238 कर्मचाऱ्यांची सेवा केली समाप्त |
मुंबई : मागील 2 आठवड्यांपासून एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काल एसटी महामंडळाने आतापर्यंत 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काल महामंडळाने संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 776 इतकी झाली आहे.
एसटी संपाला दोन आठवडे झाले तरी तोडगा निघण्याची कोणतीच चिन्हं दिसत नाहीत. दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी ठप्प आहे. तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. सरकारने संप मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी कामगारांनी ते धुडकावले आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात हजर व्हावं असे आवाहन आंदोलक नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचं काम सुरु असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. पण दोन्ही बाजूंकडून चर्चेत तोडग्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्याने संपाचा तिढा कायम आहे.
हे नक्कीच वाचा: चंद्रपूर - तीन मुलांना सोडून आईचे प्रियकरासोबत फरार ; न्यायासाठी नवऱ्याची कैफियत
गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परबांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. खासगीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे अनिल परब म्हणाले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.