Chandrapur News: पोळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 36 लागू
Chandrapur News: जिल्ह्यात दि. 6 व 7 सप्टेंबर रोजी पोळा, तान्हा – पोळा साजरा करण्यात येणार असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 5 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 लागू करण्यात आले आहे. या कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन, मिरवणूक काढण्याबाबत, मिरवणुकीचे रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिका-यांना देण्यात आले आहे.
या अंतर्गत मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकारी, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करणे तसेच धार्मिक पुजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीबाबत निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोलताशे वाजविणे इत्यादींचे निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर लाऊडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार आदींचा समावेश आहे.
सदर आदेश लागू असतांना वर नमुद बाबींबाबत संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश 5 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.