माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर पोलिसांच्या ताब्यात |
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर या फरार झाल्या होत्या. त्यांना आज सकाळच्या सुमारास ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलं आहे.
आज दुपारी लाचखोर वैशाली वीर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती. मात्र त्यापूर्वीच वीर यांना अटक झाल्याने त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी टळली आहे.सध्या नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमधील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात वैशाली वीर यांना ठेवण्यात आले आहे. लाच घेणाऱ्या वैशाली वीर या कारवाईच्या भीतीने दोन दिवसांपासून फरार झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, वैशाली वीर यांचे निलंबन करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाकडून आदेश देण्यात आले आहे. निलंबन प्रस्ताव त्वरित सादर झाल्यास वैशाली वीर यांचे निलंबन अटळ मानले जात आहे.