पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले मुख्य शासकीय ध्वजारोहण
Ratnagiri News: आपत्ती मागून आपत्ती झेलत असलेल्या रत्नागिरी जिल्हयातील जनतेसोबत शासन व प्रशासन सदैव सोबत आहे आणि आपली भूमिका पार पाडत आहे. संकटांची ही मालिका संपवून आपण जिल्हयाला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करु या असे आवाहन पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळयात केले. येथील पोलीस मुख्यालयातील पोलिस परेड ग्राऊंडवर कोविड नियमांचे पालन करुन आजचा हा ध्वजारोहण सोहळा झाला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री परब यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारली.
स्वातंत्र्याचा हा 74 वा वर्धापन दिन अर्थात 75 वा स्वातंत्र्यदिन म्हणजे अमृत महोत्सव याबाबत सर्वांना शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. नुकत्याच अतिवृष्टी व दरड दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या सोहळयास जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. कोविडच्या निर्बधांमुळे अधिकाधिक जणांना कार्यक्रम बघणे शक्य व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे फेसबुक तसेच यु टयूब, आर.के. डिजीटल केबल तसेच हॅथवे केबल वर माझे कोकण आदिमार्फत थेट प्रक्षेपण करण्यात आले.
पालकमंत्री यावेळी म्हणाले की कोरोनाच्या महामारीचा आपण गेल्या दीड वर्षापासून मुकाबला करतोय, आता व्यवहार सुरळीत होत असले तरी याच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे व हातांची स्वच्छता ठेवणे या त्रिसुत्रीचे पालन सर्वांनी कोटकोरपणे करावे असे आवाहन मी याप्रसंगी करतो.
कोरोनावर मात करण्यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करीत आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात धरुन सर्व पूर्वतयारी प्रशासनाने केली आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या आपल्या जिल्हयाचा पॉझिटिव्हटी रेट 2 टक्के पर्यंत खाली आला आहे. ग्रामीण भागात ग्राम कृती दलांनी केलेल्या उत्तम कामामुळे जिल्हयातील 1534 गावांपैकी 1214 गावे कारोनामुक्त करण्यात आतापर्यंत यश आले आहे. ग्रामपंचायतींना यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 25 टक्के रक्कम खर्च करण्याची परवानगी शासनाने दिली आहे.
कोविडवरील उपचार व क्षमता वर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून 30 टक्के रक्कम म्हणजे 75 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. ज्यातील 38 कोटीं रुपयांच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देखील प्रदान करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्हा खनीकर्म निधीतून 13 ॲम्ब्यूलन्स घेण्यात आल्या आहेत.
महिला रुग्णालयासह इतर ठिकाणी असणाऱ्या बेड्सची संख्या मोठया प्रमाणावर वाढविण्याचे काम प्रशासनाने केले आहे. दुसरी लाट आली त्यावेळी सर्वत्र प्राणवायू (ऑक्सीजन) ची गरज वाढली. यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश माननीय मख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार शुन्यापासून सुरुवात करुन आज जिल्हयात 92.47 मेट्रीक टन ऑक्सीजन साठा व निर्मिती पर्यंत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग पोहचला आहे, हे खरोखर उल्लेखनीय काम आहे. सोबत ऑक्सीजन च्या सिलेन्डर्स ची संख्याही 668 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोविड, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, तौक्ते व अलिकडील अतिवृष्टी या सर्व संकटांच्या मालिकेत प्रत्येकवेळी शासन आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहे. निसर्ग चक्रीवादळातील बाधितांना नुकसान भरपाई देताना सर्व निकष बदलून शासनाने मदत केली. यात 1 लाख 9 हजार 226 बाधितांना 153 कोटी 70 लाख 16 हजार रुपये मागणीच्या 100 टक्के मदत वाटप पूर्ण झाले आहे.
तौक्ते चक्रीवादळात बाधितांना मदत देखील वाटप करण्यात येत आहे. तर अतिवृष्टीत बाधित गावांमधील तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन निधी मधून 4 कोटी 56 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. आपत्ती दरम्यान व नंतरच्या काळात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे आल्या व तातडीची मदत तसेच जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर आदि महानगरपालिकांनी पथके पाठविली होती. आपत्ती नंतर जिल्हयातील आरोग्य यंत्रणा व बाहेरील जिल्हयातील अनेक डॉक्टर व आरोग्य सेवकांनी तातडीने साथरोग पसरु नये याची काळजी घेतल्याने नंतरच्या काळात सर्व वातावरण आता सुरळीत झाले आहे. याबाबतही मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.
आपत्तीत मदतीनंतर पुनर्वसन महत्वाचे असते. यात मंडणगड तालुक्यात वेळींच लक्ष देवून आपण पंदेरे धरणाची गळती वेळीच रोखण्यात यशस्वी ठरलो. तिवरे धरण फुटीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्या कुटुंबांना श्री सिध्दीविनायक ट्रस्टच्या मदतीने अलोरे येथे पुनर्वसन करुन नवी घरे मिळवून दिली त्याचप्रमाणे या आपत्तीत विस्थापीत झालेल्या कुटुंबाचे कायमस्वरुपी पुनर्वसन गतिमान पध्दतीने प्रशासन पूर्ण करेल याचीही खात्री मला आहे.
खेड आणि चिपळूण मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील बाधितांना निकष शिथिल करुन अधिकाधिक मदत वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या आपत्तीमधील मृतांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती मधून प्रत्येकी 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष मदत म्हणून प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेऊन लगेच वाटप सुरु करण्यात आले यात आतापर्यंत 1 कोटी 31 लाख रुपये वारसांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. या संकटात अनेकांचे संसार उध्वस्त झाले अशा सर्वांना कपडे लत्ते व भांडीकुंडी यासाठी एस.डी.आर.एफ. मधून प्रत्येकी 5 हजार व शासनातर्फे विशेष निधी म्हणून 5 हजार असे एकूण 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येत आहे. यात आतापर्यंत 3 कोटी 82 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. मयत जनावरे तसेच मत्स्य व्यावसासिकांचे झालेले नुकसान , दुकाने व टपरी धारकांचे नुकसान याबाबत देखील मदत दिली जाईल याची मी ग्वाही आपणास देतो.
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच भूमिकेतून शासन काम करते. त्यासाठी यंदा खरीप हंगामात 268 कोटी व रबीसाठी 329 कोटी असे एकूण 597 कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दीष्ट बँकाना देण्यात आले आहे. मधल्या काळात शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मोठे नुकसान सोसावे लागले. शेतीच्या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले आहेत. त्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरात लवकर देण्याचे निर्देश मी दिले आहेत असे सांगून ते म्हणाले की यंदा नेमक्या हंगामाच्या काळात कोविडची साथ वाढली त्यामुळे आंबा व्यावसायिक संकटात आला होता. त्यांना या काळात एसटी व इतर माध्यमातून आंबा वाहतुकीची परवानगी शासनाने दिली आणि आपली कटिबध्दता पुन्हा एकदा सिध्द केली.
जुलै मधील अतिवृष्टीच्या काळात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर काही अपघाती मृत्यू झाले. अशा 37 शेतकऱ्यांच्या वारसांना स्वर्गीय गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेतून देखील मदत देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपल्या पीक पेरणीची नोंद गाव नमुना 12 वर करण्यासाठी सरकारी कचेरीत यावे लागू नये यासाठी ई-पीक पाहणी ॲप ची सुविधा आजपासून मिळणार आहे. याचा जिल्हयातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.
आत्मनिर्भर सप्ताहालाही आज प्रांरभ होत आहे. आपण सक्षम होवून सोबतच आत्मनिर्भर होवूया यातून प्रथम कोरोनामुक्ती व नंतरच्या काळात पर्यंटनातून जिल्हयाचा विकास घडवू . सर्वच बाबतीत शासन आपल्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळात आपण जिल्हा निश्चितपणे प्रगती करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.