जादूटोण्याच्या संशयावरून कुटुंबाला भरचौकात जबरदस्त मारहाण
Chandrapur Crime: चंद्रपूरमधील जिवती तालुक्यातील वणी-खुर्द या दुर्गम भागात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका कुटुंबातील महिला, वयोवृद्धांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेत एकूण ७ जण जखमी असून त्यातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत शांताबाई कांबळे (५३), शिवराज कांबळे (७४), साहेबराव हुके (४८), धम्मशीला हुके (३८), पंचफुला हुके (५५), प्रयागबाई हुके (६४), एकनाथ हुके (७०) या सात जणांना मारहाण झाली आहे.
माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आत्तापर्यंत १२ आरोपींना अटक केली आहे. या घटनेबाबत अधिकची माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार दिला आहे. घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत असून चोवीस तास उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नसल्याची माहिती मिळत आहे. सध्या या गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त असून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात असून गावातील लोक यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत.
नेमके प्रकरण काय? :
प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी एका कुटुंबातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी जादूटोणा केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. विशेष बाब म्हणजे हा धक्कादायक प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक कुणीही यामध्ये पडले नाही.