अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर रूजू
अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आज स्वीकारला. जिल्ह्यातील पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर देऊ, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले.
श्रीमती कौर या मूळ पंजाब येथील आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2014 मध्ये आयएएस सेवेत निवड झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती पालघर जिल्ह्यात जव्हार येथे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त, महिला व बालविकास आयुक्त म्हणूनही काम पाहिले. अमरावती येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.
लसीकरण मोहिम सुरळीत करणार:
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तथापि, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. विशेषकरून, लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण मोहिमेत खंड पडू नये यासाठी दक्षतापूर्वक नियोजन करण्यात येत आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पुनर्वसनाबाबतचे प्रश्न व अडचणी सोडविण्यावरही प्राधान्याने भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य व पोषण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल. त्याचप्रमाणे, वैद्यकीय सुविधा उपलब्धता करून देत असतानाच तेथील स्थानिकांनी इतर अंधश्रद्धा आदी बाबींना बळी पडू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहिम हाती घेऊ. जव्हारमध्ये यापूर्वी असा कार्यक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात पांदणरस्ते योजनेच्या अंमलबजावणीला पूर्व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गती दिली. हा कार्यक्रम यापुढेही भरीवपणे राबविणार. जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्यांबाबत निर्णय व अंमलबजावणीसाठी लवकरच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागप्रमुख आदींच्या बैठका घेण्यात येतील, त्याचप्रमाणे, जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी भेटी देऊ, असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.