नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता बॅंक खात्यामध्ये जमा केल्याचा मोबदला म्हणून १ हजार रूपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी पंचायत समिती मौदा जि. गडचिरोली येथील संगणक परिचालक विलास देवराव उकडे (३०) यांना लाप्रवि पथकाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे इंदिरा नगर चाचेर जि. नागपूर येथील रहिवासी असून ते शेतमजूरीचे काम करतात. तक्रारदार यांनी २ वर्षापूर्वी ग्रामपंचायत चाचेर येथे प्रधानमंत्री आवास योजनेमधुन घरकुल मिळविण्याकरिता अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना २३ फेब्रुवारी २०२१ रोजी घरकुल मंजुर होऊन आले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आवश्यक असलेला करारनामा करण्यासाठी बांधकाम विभाग पंचायत समिती मौदा येथील संगणक परिचालक विलास देवराव उकडे यांना भेटुन घरकुल लाभाकरिता लागणारे सर्व कागदपत्रे जमा केले. त्यानंतर पंचायत समिती मौदा येथील विलास देवराव उकंडे यांनी तक्रारदारास फोन करून प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता ३० हजार रूपये बॅंक खात्यामध्ये जमा केल्याचा मोबदला म्हणून १ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना विलास उकंडे यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि भंडारा येथील कार्यालयात तक्रार दाखल केली.
लाप्रवि भंडारा येथील पोलीस उपअधिक्षक महेश चाटे यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा कारावाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी दरम्यान आरोपी संगणक परिचालक विलास देवराव उकंडे यांनी तक्रारदारास फोन करून प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता ३० हजार रूपये बॅंक खात्यामध्ये जमा केल्याचा मोबदला म्हणून १ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून लाच स्वतः पंचायत समिती कार्यालय मौदा येथे आज १६ जून २०२१ रोजी स्विकारल्याने लाप्रवि पथकाने रंगहाथ पकडले. यावरून पोलीस स्टेशन मौदा जि. नागपूर शहरर येथे उकंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई लाप्रवि नागपूरच्या पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर, अपर पोलीस अधिक्षक मिलींत तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक महेश चाटे लाप्रवि भंडारा, पोहवा रविंद्र गभने, नापोशि रोशन गजभिये, राजेंद्र कुरूडकर, दिनेश धार्मीक, पोशि चेतन पोट यांनी केली.