नागभीड (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावालगतच्या जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय गुराख्यावर वाघाने अचानक झडप घातल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास सावंगी बडगे परिसरात घडली असून, जखमीवर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी गुराख्याचे नाव कांचन प्रकाश खोब्रागडे (वय ३०, रा. सावंगी बडगे, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) असे आहे. ते नेहमीप्रमाणे आपल्या गायी, म्हशी आणि शेळ्या चराईसाठी गावालगत असलेल्या गोसेखुर्द कालव्याजवळील जंगल परिसरात घेऊन गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरे चराई करत असताना कांचन खोब्रागडे काही अंतरावर मोकळ्या जागेत बसले होते. त्याचवेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मागून त्यांच्यावर हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्यामुळे त्यांनी आरडाओरड सुरू केली.
त्यांचा आवाज ऐकून जवळच गुरे चारत असलेले दुसरे गुराखी रवी वाटगुरे यांनीही मोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे वाघाने काही क्षणांतच जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, तोपर्यंत कांचन खोब्रागडे गंभीर जखमी झाले होते.
या हल्ल्यात त्यांच्या खांद्यावर वाघाच्या पंज्यामुळे खोल जखम झाली असून हात आणि कंबरेलाही गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत त्यांना दुचाकीच्या साहाय्याने तळोधी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. दरम्यान, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली तसेच घटनास्थळाची पाहणी सुरू केली आहे.
या घटनेनंतर सावंगी बडगे आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याची चर्चा असून, शेतकरी आणि गुराख्यांनी जंगलालगतच्या भागात जाताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.