चंद्रपूर : सावली तालुक्यातील डोंगरगाव (म्हस्के) येथे घराच्या मालकीच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या संघर्षाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून मोठ्या भावाने धाकट्या भावावर आणि त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुकसू केशव बावणे (वय ५०) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी योगिता बावणे (वय ४५) यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
पाथरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामराव केशव बावणे (वय ५३) आणि त्यांचा धाकटा भाऊ कुकसू बावणे यांच्यात आईच्या नावावरील घराच्या जागेवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात शामराव यांनी कुऱ्हाडीने कुकसू यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, पतीला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या योगिता बावणे यांच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी दोघांना प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना कुकसू बावणे यांचा मृत्यू झाला. योगिता बावणे यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शामराव बावणे याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याला सावली न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कुकसू बावणे हे लोहारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात त्यांनी सांभाळल्यामुळे आईने घराची जागा त्यांच्या नावावर केल्याचे सांगितले जाते. याच कारणावरून दोन्ही भावांमध्ये सातत्याने वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या घटनेमुळे डोंगरगाव (म्हस्के) परिसरात शोककळा पसरली आहे. कुकसू बावणे यांच्या पश्चात पत्नी आणि विवाहित मुलगी असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मालमत्तेच्या वादातून एका कुटुंबाची झालेली ही अपरिमित हानी पाहून ग्रामस्थांनीही हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.