भंडारा : पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फनुली गावात एका तरुण महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी मामाच्या घरातून अचानक बेपत्ता झालेल्या मयुरी अतुल सेलोटे (वय २८, रा. कातुर्ली, ता. पवनी) हिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मयुरी आणि तिचा पती अतुल सेलोटे यांचा पवनी येथे दुचाकी अपघात झाला होता. या अपघातात पतीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तर मयुरीच्या डोक्याला मार बसला होता. उपचारानंतर तिची प्रकृती बरी झाली असली तरी मानसिक अस्वस्थता वाढल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
अपघातानंतर उपचार घेतल्यानंतर मयुरी ४ डिसेंबर रोजी मंडईच्या निमित्ताने फनुली येथील मामाच्या घरी गेली होती. मात्र ८ डिसेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास ती अचानक बेपत्ता झाली. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. अखेर अड्याळ पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवारी सकाळी गावातील काही महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. नातेवाइकांनी पाहणी केल्यानंतर मृतदेह मयुरीचा असल्याची खात्री झाली.
मयुरीच्या पश्चात दीड वर्षांची चिमुकली आणि चार वर्षांचा मुलगा आहे. आईचा मृतदेह पाहताच दोन्ही लहान मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला चिरणारा ठरला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही लहान मुले आईविना पोरकी झाली आहेत.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.