कुरखेडा-गेवर्धा मार्गावर भीषण अपघात
कुरखेडा (गडचिरोली) : कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा मार्गावर को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर बुधवारी (दि. १७ सप्टेंबर) सकाळी साधारण ११.४५ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या दुचाकीवरील दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मृत व्यक्तीचे नाव चरणदास गोमा उसेंडी (वय ५८, रा. भगवानपूर, ता. कुरखेडा) असे आहे. तर जखमींमध्ये प्रीतम ईश्वर नैताम (वय १८, रा. कोसी, ता. कुरखेडा) आणि जनाबाई नैताम (वय ६९, रा. रावणवाडी) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम नैताम व जनाबाई नैताम हे दुचाकीवरून गुरनोली-अरततोंडीच्या दिशेने जात होते. तर, एमएच-३३ डी-९३०१ क्रमांकाच्या दुचाकीवरून चरणदास उसेंडी हे कुरखेडा वरून गेवर्धा मार्गे येत होते. को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर आल्यानंतर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की तिन्ही व्यक्ती रस्त्यावर फेकल्या गेल्या.
धडकेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. तिघांनाही कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच चरणदास उसेंडी यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी गंभीर जखमी प्रीतम नैताम व जनाबाई नैताम यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे कुरखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.