एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळी भीषण दुर्घटना घडली. शेतातील लोखंडी तारेच्या कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (३५), पत्नी सुमन (३०), दोन लहान मुले – पवन व कंवल, तसेच एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. तर दीड वर्षांची दुर्गा पावरा ही बालिका चमत्कारिकरित्या बचावली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एरंडोल तालुक्याच्या वरखेडी येथील एका शेतकऱ्याने शेतातील पिके वन्य प्राण्यांच्या तावडीतून सुटावे, यासाठी शेताभोवती लोखंडी तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता.अश्यातच शेतावर जाणाऱ्या पावरा कुटुंबीयांना विद्युत प्रवाहाची कल्पना नव्हती.
आज बुधवारी सकाळच्या सुमारास पावरा कुटुंब काही कामानिमित्त शेतावर जाण्यासाठी निघाले असता वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याबरोबर त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि क्षणातच पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच गावात मोठी खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पोलिसांनी शेतमालकाला ताब्यात घेतले असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.पोलिसांकडून घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.