चंद्रपूर (नागभीड तालुका): तळोधी (बा.) पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सावर्ला शेतशिवारात बुधवारी (दि. 16) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विजेचा मोठा आघात झाला. या घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या धान रोवणीचा काळ सुरू असल्याने ओवाळा गावातील मनोज ज्ञानेश्वर मांदाडे (वय 24) आणि अक्षय नारायण मांढरे (वय 25) हे दोघे मजूर सावर्ला येथील नांगरे यांच्या शेतात काम करत होते. दरम्यान, अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान शेतातच वीज कोसळली. यात मनोज मांदाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय मांढरे हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती पोलीस पाटील अपूर्वा मेश्राम यांनी तळोधी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.