![]() |
ब्रम्हपुरी-वडसा मार्ग बंद; रपटा गेला वाहून |
चंद्रपूर: ब्रम्हपुरी ते वडसा महामार्गावरील भुती नाल्यावर असलेला इंग्रजकालीन पूल जीर्ण झाल्याने मागील दोन वर्षांपासून नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामाला संथगती असल्याने वाहतुकीसाठी नाल्याच्या बाजूला तात्पुरता रपटा तयार करण्यात आला होता.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रपटा पूर्णतः वाहून गेला असून, ब्रम्हपुरी-वडसा मार्गावरील जड वाहतूक ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत दुचाकीस्वारांनी पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला आहे. मात्र, त्या मार्गावर असलेला लहान पूल आणि वाढलेला पाण्याचा प्रवाह पाहता अपघाताचा धोका वाढला आहे.
प्रशासनाने पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून वाहन चालवू नये, असा इशारा दिला असतानाही काही नागरिक धोका पत्करत वाहने घेऊन पुढे जात आहेत. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे नसल्याने या मार्गावर स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.