भंडारा: अतिवृष्टीमुळे आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद
भंडारा: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २५ जुलै रोजी भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा धोका असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, प्रशासनाने संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे यासाठी, सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस यांना २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू असून, वैनगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागले आहे.
पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरणाचे २३ दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले असून, त्यातून सध्या ९५,००० क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता आणि अनेक घरांत पाणी शिरले होते.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील वाघ नदीवरील पूल खराब अवस्थेत असल्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांना जोडणारी वाहतूक अडचणीत आली आहे. जड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून, स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना २०–२५ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.