गडचिरोली (Gadchiroli):- जिल्ह्याच्या धानोरा (Dhanora) शहरात एका 28 वर्षीय तरुणाचा रुग्णवाहिकेला साईड देण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लीप होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुखणीय घटना आज म्हणजे 6 मे रोजी दुपारच्या सुमारास धानोरा शहरातील स्टेट बँक समोर घडली.
मृत पावलेल्या तरुणाचे नाव भागचंद(भाईचंद) माणिक लीलारे रा.पठारी,जि.बालाघाट,छत्तीसगड असे आहे. भागचंदचा विवाह झाला असून त्याला एक वर्षाची मुलगी आहे. येत्या 18 मे रोजी त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी गावाकडे जाणार होता. परंतु,काळाने झडप घातली आणि चिमुकली पितृछायेस मुकली.
मिळालेल्या माहितीनुसार, भागचंद व त्याचे वडील धानोरा शहरातील बांबू डेपो मध्ये देखरेखीचे काम पाहतात. भागचंद हा आज मंगळवारी काही कामा निमित्त दुचाकीने शहराच्या बाहेर गेला होता. अशातच तो दुपारच्या सुमारास धानोरा शहरात परत आला व वास्तव्यास राहणाऱ्या घराकडे निघाला होता. त्यातच बऱ्याच कालावधीपासून धानोरा ते चातगांव महामार्ग रस्त्याचे काम सुरू असून खोदकाम सुरू होते. तितक्यातच मुरूमगावाकडून एमएच 33 यु 4834 क्रमांकाची रूग्णवाहीका गडचिरोलीकडे जात होती व भागचंद घराकडे दुचाकी क्रमांक-एमएच 498 वाय 3106 ने जात होता. रूग्णवाहीका जवळ येताच त्याने साईड दिली. साईड देत असतांनाच खोदकाम केलेला दगड रस्त्यावर असल्याने त्यावरून दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर मार लागला. त्यातच भागचंदचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती धानोरा पोलीस प्रशासनास देण्यात आली.घटनेचा पुढील तपास धानोरा पोलिस प्रशासन करीत आहे.