निर्घृण खुनाच पर्दाफाश! आई आणि बहिणीच्या हातून 30 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून | Batmi Express

Sangli,Sangli Crime,Sangli News,Crime,

Sangli,Sangli Crime,Sangli News,Crime,

वृत्तसंस्था / सांगली : तासगाव शहरात मानवी नात्यांनाही काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कासार गल्ली येथील 30 वर्षीय सामाजिक कार्यकर्ता मयूर माळी याचा त्याची आई संगीता माळी आणि बहीण काजल माळी यांनीच गुंगीचे औषध देऊन डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाला आग लावून आगीच्या घटनेत मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला. मात्र तासगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे खऱ्या घटनेचा पर्दाफाश झाला.

घटनेचा तपशील -
शुक्रवारी रात्री मयूर माळी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यानंतर तो घरी गेला. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास माळी कुटुंबाच्या घराच्या आतील भागात अचानक आग लागल्याची घटना घडली. ही माहिती मिळताच तासगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत मयूर माळीचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत सापडला.

संशयाला बळ मिळालं -
मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असता, मयूरच्या डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे आढळले. तसेच घटनास्थळी आढळलेले पुरावेही आगीचा अपघात नसून हेतुपूर्वक घडवलेली घटना असल्याचे स्पष्ट करत होते. या सगळ्यामुळे पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले.

सतर्क तपास आणि गुन्ह्याचा उलगडा -
पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यानंतर मयूरच्या आई संगीता माळी आणि बहीण काजल माळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. कसून तपास करत असताना, या दोघींनी मयूरला आधी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली.

खुनामागील कारण अद्याप स्पष्ट नाही -
मयूरचा आई व बहिणीसोबत काही कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे शेजाऱ्यांकडून समजले. मात्र मायलेकींनी मिळून सख्ख्या मुलगा आणि भावाचा खून केल्याचे उघड होताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्याचा दुर्दैवी अंत -
मयूर माळी दोस्ती सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय होता. त्याच्या अकाली मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने नात्यांमधील विश्वासाला तडा गेला असून, समाजमन सुन्न झाले आहे.

पोलिसांची कार्यक्षम तपासपद्धती -
या प्रकरणात तासगाव पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका बनावट आगीखाली दबवण्याचा प्रयत्न असलेला खून उघडकीस आला. संगीता माळी आणि काजल माळी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.