चंद्रपूर, दि. 11 मे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पाटन येथे आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे होते.
समारंभाला प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, नगर पंचायतीचे मुख्य कार्याधिकारी यमाजी धुमाळ, सहायक प्रकल्प अधिकारी आर. एस. बोंगिरवार व राजीव धोटकर, शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव राजपूरोहित, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षक, प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व राज्यगीताने झाली.
यावेळी आमदार भोंगळे म्हणाले, शिक्षकांनी आपल्या चौकटीच्या बाहेर निघून काम करणे गरजेचे आहे. तरच विदयार्थ्यांचा सर्वांगिण विकास होवू शकतो. आदिवासी समाजाला पूढे नेण्याचे महत्वाचे कार्य हे शाळेतून होत असते. तेव्हा शिक्षकांची भुमिका ही खूप महत्वाची ठरते. शिबीरात ज्या विषयांचे प्रशिक्षण दिले गेले, त्याकरीता सर्व प्रशिक्षकांचा गौरव सुदध्या केला. तसेच एक उपक्रमशील अधिकारी म्हणून विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी यांचे कौतूक केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोंडी व वारली चित्रांच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शिबिरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, कर्मचारी व प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रकल्प कार्यालयातील विशेष योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तायक्वांडो, आर्चरी, योगा, ढोल व इंग्रजी संभाषणाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गोंडी नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रकांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार वितरणाचा विशेष क्षण:
ड्रेस डिझायनिंग कोर्समध्ये उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाच शिलाई मशीन भेट देण्यात आल्या, तर संपूर्ण शिबिरात सरस ठरलेल्या सात विद्यार्थ्यांना स्पोर्ट गिअर सायकल व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. देवाडा, बोर्डा, पाटन, कोरपना, गोंडपिपरी आणि सरडपार येथील विद्यार्थ्यांनी या यशामध्ये आपली चमक दाखवली. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रशिक्षक व शाळेतील मूल्यांकन समितीने केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव राजपूरोहित यांनी केले. संचालन सपना पिंपळकर यांनी आभार श्री. पुणेकर यांनी मानले.