गोंदिया : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 888 हजार 890 महिलांनी अर्ज केले होते. यापैकी 2 लाख 76 हजार 755 महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे. दाखल केलेल्या अर्जांपैकी छाननी प्रक्रियेत सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. दाखल केलेल्या अर्जांपैकी जिल्ह्यातील 95 टक्के महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून दुसरा क्रमांक अकोला, तिसरा रायगड, चौथा गडचिरोली तर पाचव्या क्रमांकावर सातारा जिल्हा आहे.
तालुका निहाय मंजूर झालेले अर्ज पुढील प्रमाणे आहेत. आमगाव- 29 हजार 266, अर्जुनी मोरगाव- 32 हजार 750, देवरी- 25 हजार 929 , गोंदिया- 79 हजार 250, गोरेगाव- 28 हजार 423, सडक अर्जुनी- 25 हजार 577, सालेकसा- 20 हजार 980, तिरोडा- 34 हजार 580. असे एकूण 2 लाख 76 हजार 755 अर्ज मंजूर झाले आहेत. मंजूर झालेल्या अर्जांची टक्केवारी 95.79 टक्के आहे.राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहीत महिलेला लाभ मिळणार आहे. सदर योजनेच्या नोंदणी साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे. जिल्ह्यातील जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.