तालूका प्रतिनिधी / एटापल्ली : रस्ते विकासाच्या धमन्या समजल्या जातात रस्त्यावरून देशाची संकल्पना ठरविली जाते स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन चे स्वप्न बघणाऱ्या देशात नागरिकांना जायला धड रस्ता नाही, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही लोकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, अशात दरवर्षी कोट्यवधीचा खर्च रस्त्यांच्या बांधकामावर होतो. काही ठिकाणी सिमेंटीकरणावर डांबरीकरण तर काही ठिकाणी रस्त्यावर रस्ता तयार करून निधीची उधळपट्टी केली जाते. मात्र, आदिवासी बहुल असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्राम पंचायत अंतर्गतअसलेल्या गोटेटोला या गावात स्वातंत्र्योत्तर काळापासून रस्ताच झाला नसल्याने साहेब एकदा तरी यावा, रस्ता नसलेल्या गावा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत गोटेटोला गाव आहे. ग्रामपंचायत च्या पश्चिमेस ३ किमी अंतरावर नदीच्या किनाऱ्याजवळ घनदाट जंगलात लहानसा गाव म्हणून गोटेटोला हा गाव म्हणून बसला आहे त्या गावात २९ कुटुंब राहत असून त्यांची लोकसंख्या जवळपास १२५ इतकी आहे परंतु अजुनही या गावी जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांना जंगलातून तीन किलो मीटरच्या पायवाटेने आवागमन करावे लागत आहे.अशात पावसाळ्यापूर्वी अज्ञात कंत्राटदाराने रस्त्यालगतची माती खोदून रस्त्यावर टाकला परंतु आता या पावसाळ्यात चिखलच चिखल झाल्याने आवागमनासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे यासोबतच या दुर्गम गावात शासनाच्या पायाभूत सुविधाही पोहोचल्या नसल्याने नागरिकांनी फरपट होत आहे
अनेक वर्षांपासून गावाला रस्ता मिळावा याकरिता ग्रामस्थ शासन प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवित आहेत.
पण कुणीही दखल घ्यायला तयार नसल्याने नागरिकांची समस्या कायम असल्याने रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी नजरेतून हरविलेल्या गावाकडे लक्ष देऊन विकास साधण्याकरिता पुढाकार घ्यावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.