- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांना आवाहन
- ध्वजारोहण करून ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रारंभ
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियान चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी करावे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे होणार आहे. या निमित्ताने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले आणि अभियानाचा शुभारंभ केला.
ध्वजारोहणानंतर श्री. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा… हर मन तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. ‘देशभक्ती ना हो क्षणिक उबाल… मन में पले वह पुरे साल’ अशी त्यामागची भावना आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देशाच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करताना विकासात योगदान द्यायचे आहे, असा संकल्प प्रत्येकाने करावा.’
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात अभियान सुरू झाले आहे. तिरंगा यात्रा मनामनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. तिरंगा आपल्यासाठी प्राणप्रीय आहे. देशाची शान आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.
तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नाही. भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत देशासाठी आपले प्राण अर्पण केले. स्वतः च्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. अशा वीर शहिदांचे स्मरण करूया, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.