गोंदिया :- आमगाव-देवरी मार्गावरील बाह्मणी रेल्वे चौकीपासून शंभर फूट अंतरावरील रेल्वे रूळाजवळ काल,११ जून रोजी सकाळी ७ वाजता एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.त्या मृतदेहाचे पाय शर्टने बांधलेले होते.त्यामुळे त्याचा खून करून मृतदेह रेल्वे रूळाजवळ टाकला असावा; असा कयास लावला जात आहे.
राजेश तुकाराम शिवणकर वय ५५ वर्षे,रा. भजेपार ता.सालेकसा असे मृताचे नाव आहे.राजेश शिवणकर हा १० जून रोजी रात्री १० वाजता जेवण करून घरून निघाला होता.नहेमीप्रमाणे तो गावातच असेल असे घरच्या लोकांना वाटले होते.परंतु मध्यरात्रीनंतरही तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.मात्र त्याचा पत्ता लागला नव्हता.११ जूनच्या सकाळी रेल्वे रूळानजीक राजेश शिवणकरचा मृतदेह आढळला.त्याचे दोन्ही पाय बांधले असल्याने त्याचे पाय बांधून त्याला रेल्वे रुळावर टाकण्यात आले की आधी खून करून नंतर रेल्वे रुळावर टाकण्यात आले; याचा तपास सुरू आहे.सध्या चर्चेला उधाण आले असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती.घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.घटनेची नोंद करून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.