अमरावती:- पावसाचा आनंद घेत असताना सहा वर्षाच्या चिमुकलीचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.११) अमरावतीत घडली. निवी निलेश दंदे असे या चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अमरावती येथील संजय गांधी नगर नंबर २ मध्ये निलेश दंदे राहतात. त्यांची मुलगी निवी ही आपल्या बाल मैत्रिणीसोबत सायंकाळी शेजारच्या घराच्या छतावर पावसाच्या पाण्याचा आनंद घेत होती. दरम्यान तेवढ्यात कडाक्याची वीज कोसळली. त्यामुळे ती बालिका खाली बेशुद्ध होऊन पडली. तत्काळ तिला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. तिच्यासोबत असलेल्या अन्य एका वंशिका नामक मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत चिमुकलीच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी करून आक्रोश सुरू केला होता. दरम्यान या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.