चंद्रपूर, दि. 26 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण दिन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे डॉ. अशोक उईके, प्रभारी अधिष्ठता डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. पोटदुखे, डॉ. संदिप भटकर उपस्थित होते.
सिकलसेल आजाराविषयी गैरसमज दूर करण्यासाठी तपासणी करून घ्यावी. या आजाराच्या नियंत्रणाकरीता प्रत्येक लग्न कुंडली सोबतच सिकलसेल आजाराची तपासणी करूनच लग्न करावे. लग्नापुर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकलसेल तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वाहक, वाहक व्यक्ती तसेच वाहकग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करू नये. असे लग्न झाल्यास येणारे मुल सिकलसेल ग्रस्त असू शकते. अशावेळी गर्भवती मातांनी तीन महिन्याच्या आत गर्भजल परीक्षण करून प्रसुतीबाबत निर्णय घ्यावा. यामुळे पुढील पिढीत हा आजार टाळता येतो, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी सांगितले.
डॉ. सोनारकर म्हणाले, सिकलसेल रुग्णांमध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजारी पडणे, जंतुसंसर्ग होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी पिणे, भरपूर आहार घेणे, रुग्णांनी नियमित फोलिक ॲसिड व हॉयड्राक्सीयुरीया गोळयांचे सेवन करणे महत्वाचे असते. यामुळे रुग्णास होणाऱ्या वेदना कमी होतात. अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते. सन 2047 नंतर सिकलसेल आजारग्रस्त मुल जन्माला येणार नाही. याकरीता जिल्हास्तरावर संकल्प फाउंडेशन मार्फत मोफत गर्भजल परीक्षण करण्यात येत आहे. तसेच जिल्हयात सर्व 1 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येत असल्याचे डॉ. भास्कर सोनारकर यांनी सांगितले.
सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व गावात जनजागृती करुन सर्वच शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी करण्यात येत आहे. याकरीता प्रत्येक व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची मोफत सिकलसेल तपासणी करून आपण सिकलसेलग्रस्त आहोत, वाहक आहोत की आपल्याला सिकलसेल नाही, याबाबत खात्री करून घ्यावी, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे म्हणाले.
यावेळी गर्भजल परीक्षण करून आलेल्या जोडीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सिकलसेल रुग्णांना प्रमाणपत्र, रक्त संक्रमण कार्ड वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संतोष चात्रेशवार यांनी तर आभार भारती तितरे यांनी मानले. कार्यक्रमाला परीचारीका प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पुष्पा पोडे, सिकलसेल रुग्ण लाभार्थी, तसेच रुग्णालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.