वर्धा : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून उच्च रक्तदाब, पक्षघात, हृदयविकार, कर्करोग यासारखे गंभीर आजार होत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामध्ये विविध रासायनिक घटकांचा समावेश असल्यामुळे तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक आहे.
देशामध्ये मुख कर्करोग होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या वापरामुळे तंबाखू न वापरणाऱ्यांना सुध्दा धोका निर्माण होत असून धुम्रपान करणाऱ्यांनी सोडलेला धूर श्वासाव्दारे घेतल्याने इतरांना सुध्दा आजार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी ३१ मे २०२४ रोजी तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
तंबाखू सेवनाने अकाली मृत्यू होत असून आरोग्यावर होणाऱ्या खर्चामध्ये सुध्दा वाढ होते. त्यामुळे कुटुंबावर देखील परिणाम होऊन आर्थिक विकासात घसरण होत आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे असून ३१ मे तंबाखू नकार दिनाच्या निमित्ताने तंबाखू सेवन न करण्याची शपथ घ्यावी व तंबाखूचे सेवन करु नये.
तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण हे यावर्षीच्या तंबाखू नकार दिनाचे घोषवाक्य असून ३१ मे २०२४ पर्यंत हे विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थामध्ये मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जिल्ह्यातील जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन मौखिक आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.