गोंदिया : नुकतेच पुणे येथील ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनेत दोन निष्पापांचे बळी गेले, या घटनेची पुनरावृत्ती गोंदिया जिल्ह्यात कुठे होऊ नये, या दृष्टिकोनाने गोंदिया पोलीस विभाग पुनः सज्ज झाला आहे. दुचाकी तसेच चार चाकी वाहनाची नियमित तपासणी करून वाहन चालकाचे लायसन्स तपासले जात आहे.
एखादा वाहनचालक अल्पवयीन तर नाही ना, पिऊन तर गाडी चालवत नाही ना, वाहन चोरीचे तर नाही ना या सर्व बाबींची तपासणी पोलीस विभाग करत आहे, विशेष म्हणजे मध्यरात्री सुद्धा पोलीस विभागाने ही मोहीम सुरूच ठेवली आहे, या मोहिमेत महिला सुद्धा सहभागी असून, वाहनांची कसून तपास सुरू आहे.
याशिवाय इतक्या रात्री नेमके कशा करता निघालात, याची सुद्धा माहिती पोलीस विभाग घेऊन संबंधित वाहन चालकाचे नाव पत्ता आणि मोबाईल नंबर पोलीस विभाग लिहून घेत आहे. पोलीस विभागाच्या या कारवाईमुळे मद्यपी चालकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.