सिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कच्चेपार कारगाटा जंगल परीसरात वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल २६ मे २०२४ ला ११.३० वाजताच्या सुमारास ही घडली.
मौजा. डोंगरगाव ता. सिंदेवाही येथील प्रभाकर अंबादास वेठे (४८ ) हे तेंदूपाने तोडण्यासाठी कारगाटा कंपार्टमेंट २५७ मध्ये गेले असताना वाघाने हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी लोंकाचा जमाव झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
परंतु पोलीस कर्मचारी व वनकर्मचाऱ्यांनी जमावाला दूर करीत प्रेत ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे या परिसरात शांतता होती.
वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी मृत्यू पावलेल्या नातेवाईकास पंचवीस हजार रुपयांची तात्काळ मदत केली. पुढील तपास वनविभागाचे कर्मचारी करीत आहेत.