भामरागड(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत.यामध्ये एक पुरुष कमांडर तर दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार,पेरीमी दलमचा कमांडर DVCM वासू याच्यासह अन्य दोन जण या चकमकीत ठार झाले आहेत.या दोन महिला नक्षलवादी असल्याची माहिती मिळतेय.या कारवाईत त्यांच्याकडून एके-४७, कारबाईन, इन्सास राफाईल्स ही अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
भामरागड तालुक्यीतल कत्रांगट्टा गावाजवळ काही नक्षलवादी जंगलात तळ ठोकून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती.हे नक्षलवादी काहीतरी विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचीही खबर होती. ही माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यातीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकं घटनास्थळी रवाना करण्यात आली.त्यानंतर या परिसरात शोध मोहिम राबवली जात असताना अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्याला सुरक्षा रक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.यामध्ये नक्षलवाद्यांच्या एका कमांडरसह दोन महिला नक्षलवादी ठार झाले.