चंद्रपूर : पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्या सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभपर्वावर पोंभुर्णा येथे होणार आहे. हा शानदार सोहळा पोंभुर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता होईल. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा राज्यसभा खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण होईल.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित या सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, नगर पंचायतच्या अध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार हे उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ना. मुनगंटीवार यांनी यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच मालिकेतील हा अत्यंत महत्त्वाचा असा हा सोहळा मानला जात आहे.
ऐतिहासिक उपक्रमांची मालिका :
ना. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून रायगडावर दिमाखदार राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. संपूर्ण जगातील शिवभक्त या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. तसेच आग्रा येथील औरंगजेबाच्या दिवाण-ए-खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करणे, अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे, प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला चांदीचे छत्र अर्पण करणे, रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर, शिवकालीन होन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, माॅं साहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून भारतात आणण्याचा सामंजस्य करार, जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय सेनेच्या कॅम्पमध्ये बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आदी उपक्रम राबविण्यात आले. यासोबतच राज्यभर जाणता राजा या महानाट्याचे आयोजन देखील करण्यात येत आहे.