गडचिरोली : तीन महिन्यांपूर्वी प्रसुती झालेल्या महिला पोलिस शिपाईने सासरी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना 4 जानेवारी रोजी मुलचेरा तालुक्यातील कोपर अल्ली येथे घडली. वैशाली गुलशन आत्राम (30) रा. कोपअरल्ली ता. मुलचेरा, असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिस शिपायाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वैशाली आत्राम या अहेरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. त्यांचे पतीसुद्धा अहेरी प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात कार्यरत आहेत. त्या प्रसुती रेजवर होत्या. तीन महिन्यांपूर्वी वैशाली यांची प्रसुती झाली. त्यांना दुसरा मुलगा झाला. प्रसुतीनंतर त्या सासरी कोपअरल्ली येथे कुटुंबीयासोबत वास्तव्यास होत्या.प्रसुतीनंतर त्या दडपणात होत्या. यातून त्यांची मानसिक स्थिती बिघडली व त्यांनी गुरूवारी सायंकाळी घराच्या मागच्या खोलीत जाऊन स्वतःला पेटवून घेतले. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
कारण स्पष्ट झाले नाही
विशेष म्हणजे वैशाली यांचे वडीलही पोलिस विभागात कार्यरत होते, असे समजते. मुलचेरा पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असून माहेरच्या लोकांचे बयाण घेतल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान शुक्रवारी मृतक महिला पोलिस कर्मचारीवरअंत्यसंस्कार करण्यात आले.