गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला नजीक पोलीस स्टेशन गोडलावही पासून 10 किमी अंतरावर आज 14 डिसेंबर रोजी पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी सह दोन नक्षली ठार झाले. पीएलजीए सप्ताहानंतर मोठी कारवाई मानल्या जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन गोडलावही पासून 10 किमी अंतरावर माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलीस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासीना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली असता सदर परिसरात पोलीस दलाकडून तातडीने शोधमोहीम
राबवली गेली. पोलीस दल परिसरात शोध मोहीम राबवित असताना नक्षल्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दरम्यान पोलीस दलाने बाजू सावरत प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास चाललेल्या ल्यागोळीबारानंतर परिसरात झडती घेतली असता एक AK47 आणि एक SLR शस्त्र सह दोन पुरुष नक्षलीचे मृतदेह सापडले. त्यापैकी एकाची प्राथमिक ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी, जो 2019 मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता ज्यात गडचिरोली पोलिसांचे 15 पोलीस जवान शहीद झाले होते तर दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही अशी माहिती पोलीस दलमार्फत प्राप्त झाली आहे. परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरु असल्याचे कळते.